
वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते.
ही १२ वर्षे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची विद्यार्थी दशा होय.
विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी, याचा एक आदर्शच समर्थांनी प्रस्थापित केला.
या काळात ते रोज १२०० सूर्यनमस्कार घालीत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास रामनामाचा जप करीत.
म्हणजे सहा तास नामस्मरण घडत असे.
समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत.
याचा अर्थ व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते.
स्वामी विवेकानंद म्हणत - 'मन, मनगट आणि मेंदू यांच्या संतुलित विकासाला शिक्षण असे म्हणतात.'
समर्थ व्यायामाद्वारे आपले मनगट मजबूत करीत होते, उपासना करून आपले मन बलशाली करीत होते तर श्रवण आणि अध्ययन यांद्वारे आपला मेंदू ज्ञानसंपन्न करीत होते.
माणसाने एकांगी नसावे, विविधांगी असावे. आजचे शिक्षण फ़क़्त मेंदूच्या विकासावर लक्ष केंद्रित करते.
व्यायाम आणि उपासना यांचा अभ्यासक्रमात पुरेसा अंतर्भाव नसतो.
त्यामुळे अलीकडच्या शिक्षणातून दुबळ्या शरीराची, रोगट
मनाची विलक्षण बुद्धिमान मुले तयार होत आहेत.
त्यामुळे डॉक्टर आणि मनोविकारतज्ज्ञ यांचीपण संख्या वाढत आहे.
समर्थांनी स्वयंप्रेरणेने या तिन्हींचा विकास विद्यार्थी दशेत करवून घेतला. नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी
रामदास हे नाव धारण केले.
No comments:
Post a Comment