Blogger Widgets
||श्री राम समर्थ||
||जय जय रघुवीर समर्थ||

Sunday, May 13, 2012

समर्थ - एक आदर्श विद्यार्थी




   वयाच्या १२ व्या वर्षी नाशिकला आलेले समर्थ १२ वर्षे तपश्चर्या करीत होते.
ही १२ वर्षे म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची विद्यार्थी दशा होय.
विद्यार्थ्याची दिनचर्या कशी असावी, याचा एक आदर्शच समर्थांनी प्रस्थापित केला.
या काळात ते रोज १२०० सूर्यनमस्कार घालीत. दोन तास गायत्री मंत्राचा तर चार तास रामनामाचा जप करीत.
म्हणजे सहा तास नामस्मरण घडत असे.
समर्थ दुपारी दोन तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर दोन तास ग्रंथांचा अभ्यास करीत.
याचा अर्थ व्यायाम, उपासना आणि अध्ययन या तीनही गोष्टींना समर्थांच्या जीवनात पक्के स्थान होते.
स्वामी विवेकानंद म्हणत - 'मन, मनगट आणि मेंदू यांच्या संतुलित विकासाला शिक्षण असे म्हणतात.'
समर्थ व्यायामाद्वारे आपले मनगट मजबूत करीत होते, उपासना करून आपले मन बलशाली करीत होते तर श्रवण आणि अध्ययन यांद्वारे आपला मेंदू ज्ञानसंपन्न करीत होते.
माणसाने एकांगी नसावे, विविधांगी असावे. आजचे शिक्षण फ़क़्त मेंदूच्या विकासावर लक्ष केंद्रित करते.
व्यायाम आणि उपासना यांचा अभ्यासक्रमात पुरेसा अंतर्भाव नसतो.
त्यामुळे अलीकडच्या शिक्षणातून दुबळ्या शरीराची, रोगट
मनाची विलक्षण बुद्धिमान मुले तयार होत आहेत.
त्यामुळे डॉक्टर आणि मनोविकारतज्ज्ञ यांचीपण संख्या वाढत आहे.
समर्थांनी स्वयंप्रेरणेने या तिन्हींचा विकास विद्यार्थी दशेत करवून घेतला. नाशिकमध्ये आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी
रामदास हे नाव धारण केले.






हनुमंताची मूर्ती सोन्याची....कि शेणाची?




समर्थांनी नाशिक येथे टाकळीला हनुमंताची मूर्ती स्थापन केली.
हि मूर्ती सोन्याची कि शेणाची यावरून एक गमतीदार घटना घडली.
टाकळी जवळच्या रानात गुरे चारायला दोन गुराख्याची पोर यायची.
त्यांतील एक जण म्हणाला की 'हनुमंताची मूर्ती सोन्याची आहे.' तर दुसरा मुलगा म्हणाला कि,'मूर्ती शेणाची आहे. दोघांनी मूर्ती पाहिली होती,
त्यामुळे दोघेघी आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते.
अखेर प्रकरण पैज लागण्यापर्यंत गेले. दोघांनी मंदिरात जाऊन मूर्ती पहायची; ज्याचे म्हणणे खोटे असेल त्याने आपल्या गायी दुसऱ्याला देऊन टाकायच्या, असे ठरले.
दोघेही जण मंदिरात आले.
मूर्ती सोन्याची आहे असे म्हणणारयाने लाकडाच्या
एका तुकड्याने हनुमंताची शेपटी थोडी खाखाडली तेव्हा ती सोन्यासारखी चमकू लागली.
आता आपल्या सर्व गायी देऊन टाकाव्या लागणार म्हणून दुसरा मुलगा रडू लागला.
त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून समर्थ मंदिरात आले.
समर्थ त्या दोघांना म्हणाले - ' तुम्ही दोघे बरोबर आहात.
मूर्ती गायीच्या शेणाची आहे आणि शास्त्र सांगते,
गायीच्या शेणात लक्ष्मीचा वास आहे.
गायीच्या शेणखतामुळे शेतात सोन्यासारखे पीक येते.
त्या दृष्टीने विचार केल्यास मूर्ती सोन्याची देखील आहे'.
जो मुलगा रडत होता त्याचा चेहरा फुलला.
दोघे जण आनंदाने आपापल्या गायी घेऊन घरी गेले.
समर्थांनी अशा प्रकारे छान मध्यस्थी केली.





संत रामदास आणि संत तुकाराम



शरीर दुखांचे कोठार
परमेश्वर प्राप्तीचे साधन म्हणजे हा नरदेह. या शरीराच्या सहाय्यानेच धर्माप्रमाणेच 

वागून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवायची. " शरीरमाद्यं खलु धर्म साधनम |
" पण हे शरीर आहे तरी कसे ?
 त्यावर श्री समर्थ रामदास म्हणतात
पाहता शरीराचे मूळ | या ऐसे नाही अमंगळ |
रजस्वलेचा जो विटाळ | त्यामध्ये जन्म यांसी ||||११
नरकाचे कोठार भरले | आंत बाहेरी लीदबीडले |
मूत्र पोतडे जमले | दुर्गंधीचे ||||१८||

त्यावर जगद्गुरू संत श्री तुकाराम म्हणतात
शरीर दुखांचे कोठार | शरीर रोगांचे भांडार ||
शरीर दुर्गंधीची ठार | नाही अपवित्र शरीर ऐसे ||
शरीर विटाळाचे आळे माया मोहपाश जाळे ||
पतन शरीराच्या मुळे | शरीर काळे व्यापिले ||






॥ श्री मनाचे श्लोक ॥१५॥




मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी।
जितां बोलती सर्वही जीव मी मी॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥


अर्थ : - हा शब्द शंकररावांचा आहे, हे लक्षात ठेवा! उद्या माझ्या मोटारने मी तुमच्याकडे येणार, तेथे जेवणार. या माझ्या निश्चयात कसलाही फरक होणार नाही. शंकररावांचे मित्र हे आश्वासन ऐकून संतुष्ट झाले. शंकरराव बडे अधिकारी होते आणि त्यांच्याकडून त्यांच्या स्नेह्यांना काही काम करून घ्यायचे होते पण गोष्ट अशी होती की, शंकररावांनाही या स्नह्याकडून काही लाभ होता आणि म्हणूनचे त्यांनी हे निग्रहाचे आश्वासन दिले होते. शंकररावंाच्या पोटात दोन टॉयफॉईडचे जीवाणू हसत खिदळत यावेळी बसले होते. थोड्या वेळापूर्वीच, शंकररावांनी प्यालेल्या पाण्यातून ते शंकररावंाच्या पोटात उतरले होते. शंकररावांची ही बढाई ऐकून, नंतर पोटात गेलेल्या त्या दोघांपैकी एक टॉयफॉईडचा जंतू पोट धरूनधरून हसला. म्हणाला, “या मूर्खाचे कसले हे मत, आणि वचन? दोन तासांत हा आता आडवा होणार आहे. तो पाच-पंचवीस दिवस काही अंथरूणाबाहेर पडणार नाही. शंकररावंाचे मन आणि मत खोटे ठरले. जीवाणूंचे खरे ठरले. मी मीम्हणत मनुष्य ज्या कल्पना करतो, त्याचे त्याच्या शरीरावरही पुरते नियंत्रण नसते. रामदासा पंधराव्या श्लोकात या मीपणावर बोट ठेवून सांगतात की तुमचे कर्तृत्व, अहंकार, माया या सर्वांपेक्षामत्यूहे अधिक सत्य आहे. हे न जाणता, येतो तो मनुष्य आपला आपल्या मुलालाचिरंजीवम्हणून संबोधित राहतो. आपण आणि आपले आवडते सगळेच चिरंजीव राहणार आहोत, या मीपणात हा मनुष्य सर्व जन्म घालवतो.



शीख धर्मगुरूंची भेट






समर्थ रामदास हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारतभर फिरले.
ते श्रीनगरला असतांना योगायोगाने त्यांची भेट शिखांचे सहावे धर्मगुरू हरगोविंद यांच्याशी झाली.
हरगोविंद यांच्याबरोबर १००० सैन्य असायचे.
त्यांच्या कमरेला दोन तलवारी असत.
त्यांचा हा सर्व सरंजाम पाहून समर्थांना खूप आश्चर्य वाटले.
समर्थांनी हरगोविंदांना विचारले - " आपण धर्मगुरू आहात. या दोन-दोन तलवारी आपण का बाळगता ?"
तेव्हा गुरु हरगोविंद म्हणाले - " एक तलवार धर्माच्या रक्षणासाठी तर दुसरी स्त्रियांच्या शीलरक्षणासाठी".
समर्थांनी पुन्हा आश्चर्याने विचारले - "आणि हा सारा फौजफाटा ?"
त्यावर हरगोविंद म्हणाले - " धर्माचे रक्षण करणारे हे सैन्य आहे.
सध्या शत्रू एवढे अन्याय करीत आहे की,
केवळ शांती आणि सलोखा यांनी प्रश्न सुटणार नाही.
आपल्याला शस्त्रसज्ज झाले पाहिजे.
या जगात दुर्बल माणसाला काही किंमत नसते.
आपण बलशाली झाले पाहिजे."
समर्थांना हिमालयात प्रभू रामचंद्रांकडून धर्मसंस्थापनेसाठी प्रेरणा मिळाली होती.
त्यापाठोपाठ गुरु हरगोविंद यांनी त्यांना सशस्त्र क्रांतीची प्रेरणा दिली.
यानंतर समर्थांनी जागोजागी हनुमंताची मंदिरे उभी केली .
हनुमान हि शक्तीची देवता. हनुमान मंदिरात ते तरुणांना संघटीत करत आणि त्यांना व्यायामाची प्रेरणा देत.
धार्मिक मनुष्य अनेकदा परमार्थाच्या नावाखाली दुर्बल होतो.
स्वामी विवेकानंद म्हणत असत -
"माझा वीरभाव आहे" समर्थ देखील सामर्थ्याचे उपासक होते.
कोणत्याही राष्ट्राला ताठ मानेने जगायचे असेल तर ते शस्त्रसज्ज असले पाहिजे. म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या बांधवांना लष्करात भरती व्हायला सांगितले.







॥ श्री मनाचे श्लोक ॥





मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते।
अकस्मात होणार होऊनि जाते॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे।
मतीमंद तें खेद मानी वियोगें॥

अर्थ : - चिंता आणि प्रयत्न यात फरक आहे.प्रयत्न सोडू नये. चिंता धरू नये. मन नेमके उलटे करते.म्हणून रामदास सुचवीत आहेत की, चिंता वाहू नका. कोणी म्हणतो चिंता केल्याशिवाय हातून प्रयत्न कसा होणार? तेथे सूक्ष्म फरक आहे. परीक्षा नापास होईन आणि माझी बेअब्रू होईल. या भीतीने जो अभ्यास होतो, तेथे चिंता असते. परंतु अभ्यास करण्यामुळे होणारा आनंद मी घेईन, अभ्यासाने माझे ज्ञान वाढणार आहे, आयुष्याचा अर्थ मला कळणार आहे, अभ्यास करणे माझे कर्तव्य आहे, त्यानेच माझे आयुष्य सुखाचे जाणार आहे, अशा भावनेने, अशा जिद्दीने जो अभ्यास होतो, तो प्रयत्न. त्या प्रयत्नात चिंता उणी झालेली असते.
बहुधा सामान्य माणसाच्या प्रयत्नाला चिंतेचे ओझेच अधिक असतं. त्यामुळेच नकळत अडथळा होतो तो प्रयत्नाला. म्हणून रामदास सांगत अहेत की, तुझे कर्तव्य तू करत असताना अडथळा यायचाच असला, तर तो अकस्मात येईल. कोणता अडथळा येण्याची शक्यता आहे, याबद्दल फार तर तू विचार करून ठेव. मग पुन्हा पुन्हा चिंतेची चिता पेटवू नकोस. जो कोणता अडथळा यायचा तो मागल्या कर्माच्या संकुल हिशोबाने येणार. पण या ज्ञानाचाच विवेक नसल्यामुळे मतिमंद माणसाला चिंता चावत राहते. शेवटल्या दोन ओळींचा भर दैववादाकडे नाही. कर्मसिध्दान्त म्हणजे दैववाद नाहीच. मला जे काय मिळत आहे, ते माझ्या पूर्वकर्माने मिळत आहे. पूर्वी कर्म करण्याचा माझा अधिकार होता; आहे, त्या अनुभवावरून माझ्या कर्मपध्दतीत योग्य तो बदल घडवून आणू शकतो, हे उघड आहे. हा रामदासांचा अभिप्राय आहे. तिसऱ्या श्लोकांतला सदाचारहा शब्द, सातव्या श्लोकातला धैर्य उपदेश’, आठव्या श्लोकातला चंदनरूप प्रयत्न’. प्रयत्न महात्म्यच सांगतात.

श्री समर्थ रामदास स्वामी




तो अंतरात्मा म्हणिजे देव। त्याचा चंचळ स्वभाव । पाळिताहे सकळ जीव। अंतरीच वसोनि।११ -४-३। ।




अंतरात्मा हाच देव जो सर्व जीवांच्या अंतर्यामी राहतो .त्यांचे पालन करतो . अंतरात्मा सर्व दृष्याचे मूळ आहे .अंतरात्मा तो एकच आहे जो विश्वरूपाने विस्तार पावला आहे .पण सगुणामध्ये .दृश्य प्रकृती मध्ये विश्वरूपाने विस्तार पावलेला आत्मा हा अनेक प्रकारांच्या बदलांचा ,भेदांचा आहे ,त्यामुळे तो शाश्वत नाही .अंतरात्मा र्वत्र व्यापून असतो पण सर्व प्राण्यांत माणसात सारख्या सामर्थ्याने प्रकट होत नाही .शरीराला जिवंत ठेवणारी ,इंद्रियांना चेतना देणारी ,मनाच्या व्यापारांना प्रेरणा देणारी ,बुध्दी ला विचार करायला लावणारी ,जीवपणाने सुखदू : भोगणारी ,उद्वेग ,चिंता ,माया ममता अनुभवणारी सूक्ष्म चित्कला ती आत्मा !देहात राहणारा आत्मा डोळ्यातून पाहतो ,कानातून ऐकतो ,नाकातून वास घेतो .तो एकटा इंद्रियांद्वारा सगळी हालचाल घडवून आणतो आत्माच उठतो ,निजतो,चालतो ,पळतो सर्व क्रिया घडवून आणतो .देह नाशवंत आहे ,आत्मा शाश्वत आहे ,खरा देव आहे .
पिंडाच्या दृष्टीने देह धारण करणारा आत्मा तो जीव ,ब्रह्मांडाच्या दृष्टीने विश्व धारण करणारा तो शिव .जसे पिंडाचे चार देह तसे ब्रह्मांडाचे चार देह असतात .विराट ,हिरण्यगर्भ,अव्याकृत मूळमाया .या चार देहांनी ईश्वर विश्वाला धारण करतो .तो त्रिगुणातीत असतो .त्रिगुणातीत असणारा ईश्वर म्हणजे परब्रह्म ! परब्रह्मामध्ये जो संकल्प निर्माण होतो तो स्फुरणरूप असतो .त्या संकल्प रूपाला मूळमाया म्हणतात .मूळमायेची दोन अंगे असतात .एक शुध्द जाणीव रूप दूसरी शक्तीरूप .जाणीव रूप अंगाला मूळपुरूष म्हणतात .त्यालाच समर्थ थोरला देव म्हणतात.






श्री समर्थ रामदास स्वामी कृत : - खंडे रायाची सवायी (जेजुरी गड )


 नाम जेजुरीगड सुंदर तेथे नांदे म्हाळसावर
संगे भैरवगण अपार पूर्ण अवतार शिवाचा
पीत अश्वावरी स्वार हाती घेऊनी तलवार
करी मणिमल्ल संहार करी उध्दार जगाचा
चंपाषश्ठीचा उत्सव थोर यात्रा मिळती अपार
येळकोट नामाचा गजर भक्त आनंदे करिताती
दास म्हणे रामराव राम तोचि खंडेराव
जेथे भाव तेथे देव लक्ष पायी जडलिया
म्हणावा जयजय राम !

सुंदर जेजुरी गडावर म्हाळसापति खंडेराव नांदतो आहे .तो शिवाचा अवतार असल्यामुळे शिव शंकरांचे भैरव गण ही बरोबर आहेत .पिवळ्या घोड्यावर स्वार होउन ,हातात तलवार घेऊन मणिमल्लाचा राक्षसाचा संहार करून त्याच्या पासून लोकांचे रक्षण केले .जगाचा उध्दार केला
कृत युगात दैत्य उन्मत्त झाले .त्यांनी मुनींवर हल्ले चढवले .सर्व देवांनी शंकरांकडे धाव घेतली .महादेवांनी मल्हारी मार्तंडाचे अक्राळ विक्राळ रूप घेतले .मणी दैत्या बरोबर युध्द पुकारले .मणीच्या छातीवर त्रिशूलाचा प्रहार केला .तो मूर्छित पडला ,सावध झाला पुन्हा युध्द करू लागला .महादेवांनी शक्तिशाली ब्रह्मास्त्र फेकून त्याला मूर्छित केले। त्रिशूल फेकले आणि भूमीवर पाडले .मणी दैत्य शरण आला .आणि मला जन्मोजन्मी तुझा दास होऊ दे .मला मुक्ती दे असा वर मागुन घेतला .देवाने तथास्तु म्हटले .मणीचा पुतळा आजही खंडेरायाच्या मूळ देवळा समोर हात जोडून उभा आहे .मणी चा भाऊ मल्लासूर भावाच्या वधाच्या सूडाने पेटला .त्याने जोरात युध्दाला सुरुवात केली .मार्तंडाने त्रिशूल फेकून त्याला धरणीवर पाडले .मल्लासूर नतमस्तक झाला .त्याने प्रभूंना विनंती केली - तुमच्या आधी माझे नाव यावे .देव तथास्तु म्हणाले .तेव्हा पासून मार्तंडाला मल्हारी मार्तंड म्हणतात
चंपाषष्ठी चा खूप मोठा उत्सव जेजुरी गडावर भरतो ,खुप मोठी यात्रा भरते .येळकोट येळकोट जय मल्हार असा गजर होतो .समर्थ रामदास म्हणतात की श्रीराम म्हणजेच खंडेराव आहे .समर्थांना सर्वत्र श्रीराम दिसत असल्यामुळे खंडोबा ठिकाणी श्रीरामच आहेत असे समर्थ म्हणतात .जेव्हा दैवताच्या ठिकाणी मन जड़लेले असते तेव्हा जो भाव असतो तसा देव आपल्याला भेटतो.